‘बालक मंदिरात अवतरली ज्ञाननगरी
सी. एच. एम. इ. सो. संचालित बालक मंदिर पाचवी ते सातवी मराठी माध्यमात शुक्रवार दि. 22 डिसेंबर 2023 रोजी राष्ट्रीय गणित दिनाचे औचित्य साधून ज्ञाननगरी अवतरली. या ज्ञाननगरीत गणित व विज्ञानाचे प्रदर्शन भरविण्यात आले. या ज्ञाननगरीचे उद्घाटन व दिपप्रज्वलन गणित विषयतज्ञ मा.श्री रघुवीर अधिकारी सर यांच्या हस्ते झाले. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. नीता पाटील मॅडम ,शालेय समिती अध्यक्षा मा.सौ. सुवर्णा दाबक मॅडम तसेच शालेय समिती सदस्या मा.सौ.आसावरी धर्माधिकारी मॅडम उपस्थित होत्या.
गणित-विज्ञान सारख्या क्लिष्ट विषयातील संकल्पना प्रतिकृती, खेळ व मनोरंजन याद्वारे सहजरित्या विद्यार्थ्यांना समजाव्यात तसेच विद्यार्थ्यांची या विषयाची भीती दूर व्हावी आणि त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा हा या प्रदर्शनाचा मुख्य उद्देश होता. या ज्ञाननगरीत गणित-विज्ञान विषयांच्या क्षेत्रानुसार गणिती खेळ, विषयासंबंधी रांगोळ्या, पीपीटी, कापरेकर स्थिरांक, प्रदूषण व त्यावरील उपाय, पाढे, अन्नभेसळ ओळख, फिरता रोबोट, चांद्रयान, फिरती सूर्यमाला अशा अनेक शाखा होत्या.
प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण असलेल्या पर्यावरणाच्या सापशिडीद्वारे विद्यार्थ्यांनी आहाराचे महत्त्व जाणून घेतले, सूर्यप्रकाशावर चालणारी गाडी तसेच गणित व विज्ञान यांचा बगीचा तयार करून अनेक अवघड संकल्पना विद्यार्थ्यांनी हसत- खेळत अवगत केल्या. रांगोळीचा वापर करून विद्यार्थ्यांनी गणितज्ञ व शास्त्रज्ञ साकारले.
शिवराज्याभिषेक सोहळ्याला ३५० वर्षे पूर्ण होत आहेत त्याचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक भव्य अशी रायगडाची प्रतिकृती साकारली. त्यासोबत विद्यार्थ्यांना दिवाळीत दिलेल्या ‘किल्ले बनवा’ या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या किल्ल्यांच्या प्रतिकृती प्रदर्शनात मांडण्यात आल्या. तसेच संस्थेचे संस्थापक डॉ.बा.शि. मुंजे यांच्या जयंतीनिमित्त घेतलेल्या चित्रकला स्पर्धेतील चित्रे देखील यात समाविष्ट करण्यात आले.
हे प्रदर्शन पाहण्यासाठी पालक देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. या ज्ञाननगरीचे सर्व मान्यवरांनी तसेच पालकांनी भरभरून कौतुक केले. प्रदर्शनासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. नीता पाटील मॅडम तसेच गणित-विज्ञान शिक्षिकांचे विद्य विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.