मराठी दिन

शिशुविहार व बालक मंदिर 5-7    06-Mar-2020
Total Views |

मराठीदिन_1  H x

ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झालेले आपल्याच ह्या मायभूमीतील दिग्गज कवी म्हणजे ‘वि.वा.शिरवाडकर’ उर्फ ‘कवी कुसुमाग्रज’ यांचा जन्मदिवस मराठी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. याचेच औचित्य साधून शाळेत विद्यार्थ्यांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले. कार्यक्रमाची सुरुवात विभागप्रमुख सौ.नीता पाटील यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थीनींनी केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी मराठी भाषेचा अभिमान ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी....’ या गीताचे सादरीकरण केले. मराठीचे मानाचे तुरे असलेले कवी कुसुमाग्रज, वि.स. खांडेकर, प्र.क.अत्रे, पु.ल. देशपांडे, शांताबाई शेळके, कवयित्री बहिणाबाई यांची स्वगते विद्यार्थ्यांनी वेशभूषेसह सादर केली. ग.दी. माडगुळकर यांच्या ‘गोमू माहेरला जाते हो नाखवा...’ या गीतावर विद्यार्थ्यांनी कोळी वेशभूषेत नृत्य सादर करून कार्यक्रमास रंगत आणली. यानंतर मराठी भाषेचा गौरव करणारा पोवाडा विद्यार्थ्यांनी सादर केला.

या सर्व गोष्टींसाठी विद्यार्थी उत्स्फूर्ततेने सहभागी झाले. अश्या प्रकारे कवी व लेखकांची ओळख व्हावी हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

शाळेच्या विभागप्रमुख सौ. नीता पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांना सांगितले आपली मराठी भाषा ही खूप समृद्ध व संपन्न असून तिच्या प्रती आपणास अभिमान व गर्व असायला हवा. तिच्या विषयी आदर बाळगला पाहिजे. विद्यार्थ्याना रोजच्या व्यवहारात मराठीचा वापर करून मराठी लेखक व कवी यांची जास्तीत जास्त पुस्तके वाचावीत असे आव्हान केले. तसेच आपल्या पाल्यांना मराठी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेतला त्याबद्दल पालकांचेही आभार मानले. कार्यक्रमाची सांगता शांतिमंत्राने झाली.